
महागडय़ा एसी लोकलमुळे साध्या लोकलची आपली नेहमीची एकही फेरी गमावण्याची मुंबईकरांची तयारी नसल्याचे माहिती असूनही रेल्वेने एसी लोकलच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचा फार्स सुरूच ठेवला आहे. पश्चिम रेल्वेकडे नऊ, तर मध्य रेल्वेकडे चार अशा तब्बल तेरा एसी लोकल कारशेडमध्ये पडीक असून त्यांच्या वापराबद्दल रेल्वे बोर्ड काय निर्णय घेणार याकडे रेल्वे अधिकाऱयांचे लक्ष लागले आहे.
15 जूनपासून रेल्वेने एसी लोकलच्या बाबतीत प्रवाशांचे आणि प्रवासी संघटना यांचे काय मत आहे याचे ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. पंधरवडय़ातच अकरा हजार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी आपली मते नोंदविली आहेत. सध्या रेल्वे कारशेडमध्ये पडून असलेल्या एसी लोकलच्या चलनासाठी रेल्वे प्रवासी संघटना यांचे मत काय आहे यासाठी 29 जून रोजी रेल्वे अधिकाऱयांनी झूम मीटिंगदेखील बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. आतापर्यंत 70 टक्के प्रवाशांनी आपण खाजगी कार, टॅक्सी, बस, ओला आणि उबर पेक्षा एसी लोकलद्वारे प्रवास करण्यास तयार असल्याचे मत नोंदवले आहे. फर्स्ट क्लासच्या दहा टक्के जादा भाडे भरण्यास प्रवासी तयारी दाखवतील, परंतु तीन डबे एसीचे आणि नऊ डबे साधे असावेत असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
मुंबईत उघडय़ा लोकलच्या दारातून पडून रोजचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद दाराच्या एसी लोकलची संकल्पना पुढे आली, परंतु मुंबईत फर्स्ट क्लासच्या 1.3 पट असलेले एसी लोकलचे जादा भाडे भरण्यास कोणी तयार नसल्याने एसी लोकलकडे सर्वसामान्यांनी पाठ फिरवली आहे. कोरोना निर्बंध काळात लोकलची सेवा अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांसाठी सुरू असून पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य रेल्वेवर कल्याण ते सीएसएमटीच्या दरम्यान एसी लोकल चालविण्यात येत असून बहुतांश फेऱया रिकाम्या धावत असतात.
- हे सर्वेक्षण आणखी आठवडाभर चालणार आहे. यातील प्रवाशांचे निष्कर्ष आम्ही रेल्वे बोर्डाकडे सादर करणार असून त्यानंतर रेल्वे बोर्ड योग्य तो निर्णय घेईल असे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी सांगितले.




























































