पालिकेची पूलबांधणी जोरात! अंधेरीचा गोखले पूल दीड वर्षात बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेने पुलांचे मजबुतीकरण आणि धोकादायक पूल नव्याने बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अंधेरीच्या गोखले पुलाचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार असून पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणाऱया सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्यावर दोन उड्डाणपूल, पुलांवरील भार कमी करणे आणि घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या विस्तारित कामाचा समावेश आहे. या कामांसाठी पालिका सुमारे 437 कोटींचा खर्च करणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिकाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने धोकादायक पुलांची दुरुस्ती क पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. यामध्ये अंधेरीच्या गोखले पुलाच्या बांधकामासाठी 138 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये 265 मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. याची रुंदी 26.8 मीटर (दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे फुटपाथ) असून पूल आरसीसी स्ट्रक्चर आणि स्टील गर्डरच्या माध्यामातून तयार करण्यात येणार आहे. कंत्राटदार मे. एसएमएस इफ्रास्ट्रक्चर लि. कडून बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

‘आयआयटी’च्या शिफारशीनुसार भार कमी करणार

पश्चिम रेल्वेवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट रेल्वेने आयआयटी, मुंबईकडून करून घेतले होते. यानुसार पी आणि आर विभागातील पूल मार्गिकेचे थर पूर्णपणे क्रॅपिंग करून त्यावर मास्टिक अस्फाल्टचे थर देण्यात येणार आहेत. यामुळे पुलाच्या स्लॅबवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये गोरेगावपासून बोरिवलीपर्यंतच्या चार पुलांचे काम केले जाणार आहे. या कामांसाठी 4 कोटी 5 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

सांताक्रुझ-चेंबूर मार्गावरील वाहतूक वेगवान होणार

सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. विशेष म्हणजे शासनाचे अतिमहत्त्वाचे अधिकारी व मंत्री विमानतळावर जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र सद्यस्थितीत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दोन्ही पूल जीर्ण झाल्याने ते पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या जोडरस्त्याच्या कामांतर्गत संबंधित प्राधिकरणाकडूनच हे काम करून घेतले जाणार आहे. या उड्डाणपुलाची रुंदी 45.7 मीटर व लांबी 110 मीटर असेल. या कामासाठी पालिका एकूण 45.07 कोटींचा खर्च करणार आहे.

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाचे वाढीव काम

पालिकेच्या एम/पूर्व विभागामध्ये घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावर शिवाजीनगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राऊंड जंक्शनपर्यंतच्या उड्डाणपुलाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य उड्डाणपुलाच्या अबुटमेंट-ए-2 पासून ते मोहिते-पाटील येथील भुयारी वाहतूक मार्गापर्यंत उड्डाणपुलाचे काम विस्तारीत करण्यात येणार आहे. मात्र या कंत्राटाच्या किमतीत 246 कोटींची वाढ झाली असून एकूण कंत्राटाची किंमत 713 कोटींवर गेली आहे.