
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. मुंबईची ग्रामदेवी असलेल्या श्री मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत मंदिर रोज दर्शनासाठी पहाटे 5.30 वाजता उघडून रात्री 10.30 वाजता बंद करण्यात येईल, अशी माहिती मुंबादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
मुंबादेवी मंदिरात 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी 5.30 वाजता मंगला आरती करून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले जाईल. याच दिवशी सकाळी 7.30 च्या दरम्यान घटस्थापना होईल. मंदिरात 9 दिवस 25 पंडितांकडून रोज श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण होईल. नवमीचे हवन सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रारंभ होऊन सायंकाळी 4.30 वाजण्याच्या दरम्यान पूर्णाहुती होईल. वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया किंवा ज्यांच्या हातामध्ये लहान बालके आहेत अशा भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही व अशा भाविकांना प्राधान्याने दर्शन उपलब्ध करून द्यावे असे निर्देश सुरक्षा रक्षकांना व स्वयंसेवकांना मंदिर प्रशासनाने दिले आहेत. भाविकांनी मोठय़ा संख्येने उत्सवादरम्यान दर्शनासाठी यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखली आहे. मंदिराबाहेर भाविकांसाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची तसेच सरबताची देखील सोय केली आहे. आपत्कालीन व्यवस्था म्हणून पाच डॉक्टरांची टीम त्याचबरोबर अॅम्ब्युलन्स तैनात असणार आहे. वैष्णव चॅरीटेबल आणि मेडिकल ट्रस्ट व मुंबादेवी भक्त मंडळ या संस्थेचे 100 स्वयंसेवक दिवसभर मंदिरात सेवा देणार आहेत. याशिवाय पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्पॅनर लावण्यात येईल.




























































