
मुंबईत कोरोना आता पूर्ण नियंत्रणात आला असून एकही अत्यवस्थ रुग्ण नाही. शिवाय 290 सक्रिय रुग्णांमधील 85 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर फक्त 44 जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मुंबई 100 टक्के कोरोना सुरक्षित झाल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तीन लाटा आल्या. यामध्ये आता तिसरी लाटही पूर्ण आटोक्यात आली आहे. त्यामुळे मास्क आणि सुरक्षित अंतर वगळता 31 मार्चपासून बहुतांशी सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहे. परिणामी पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सद्यस्थितीत दररोज दहा हजारांवर चाचण्या होत असताना केवळ 30 ते 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईत 99 टक्के लसीकरण झाल्यामुळे आणि तिसऱया लाटेतच ‘स्टेल्थ बी-2’ या नव्या व्हेरिएंटचा यशस्वीरीत्या सामना केल्यामुळे मुंबईसाठी धोका कमी आहे. मात्र युरोप-चीनसह काही देशांमध्ये या नव्या व्हेरिएंटने धोकादायकरीत्या थैमान घातलेले असल्याने मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आता शाळांमध्येही मुलांना डोस
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जात आहे. मात्र सद्यस्थितीत परीक्षा काळ असल्याने मुलांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे.
20 मार्चपासून लसीकरण सुरू झाले असताना चार लाख मुलांपैकी फक्त 5 टक्के जणांनी डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता शाळांमध्येही व्हॅक्सिनेशन कॅम्प लावण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मास्कशिवाय फिरू नका, कारवाई सुरू आहे!
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात असला तरी कोरोना खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे अजूनही बंधनकारकच आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मास्कशिवाय फिरणाऱया 700 ते 800 जणांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरू नये असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मास्क वापरणे बंधनकारकच असून कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पालिकेने कोरोना काळात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 91 कोटी 76 लाख 93 हजार 075 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, तिन्ही रेल्वे मार्गावरही विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 46 लाख 14 हजार 295 जणांवर कारवाई करून 200 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
































































