दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी वाढले; तोंडी परीक्षा, कमी अभ्यासक्रमाचा फायदा

मुंबई विभागातून दहावीचा परीक्षा अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. 25 जानेवारीपर्यंत विभागातून 3 लाख 44 हजार 130 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यंदा कोरोनामुळे मुंबई विभागातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. बहुसंख्य विद्यार्थी अजूनही आपल्या मूळ गावीच आहेत. त्यामुळे यंदा परीक्षा अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा कमीच असण्याची शक्यता मुख्याध्यापकांनी वर्तविली होती. पण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदत वाढवून दिल्याने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

17 नंबरचे विद्यार्थी वाढले

17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. 2018-19 या वर्षी आधीच्या सरकारने तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागला. आता गेल्या वर्षीपासून म्हणजे 2019-20 च्या परीक्षेत पुन्हा तोंडी परीक्षा सुरू झाला. याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला.

दहावीचा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. त्यामुळे आधीच्या वर्षी नापास झालेले विद्यार्थी आता 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसत आहेत. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना जो निकष लावला होता. तशीच पद्धत दहावीचा निकाल जाहीर करताना अवलंबल्यास वर्ष सुटू शकते या विचाराने अनेक रिपिटर्स विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या