मुंबईत फक्त अठरा हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस! साडेसात हजारांना लक्षणेही नाहीत

4089

मुंबईत जरी एकूण रुग्णांची संख्या 38 हजारांवर दाखवली जात असली तरी यातील सोळा हजारांवर रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय 7 हजार 446 रुग्णांना आता कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 4 हजार 132 कोरोनाबाधित रुग्णांचीही प्रकृती सुधारली असून त्यांना कोरोना केअर सेंटर – 1 मध्ये बीएएमएस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये पण काळजी घ्यावी आणि रुग्णसंख्येवरून गैरसमज पसरवू नये आवाहनही चहल यांनी केले. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबईत दररोज नवीन रुग्ण नोंद होत असले तरी दररोज कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. मुंबईत 9 मार्चपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागल्यानंतर एप्रिल महिन्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवर पोहोचले. यामुळे मे अखेरीस मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 40 हजारांहून अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत स्थिती नियंत्रणात असल्याचे आयुक्त म्हणाले.

यासाठी आठ सनदी अधिकार्‍यांची टीम काम करीत असून सर्व विभागांचा रुग्ण डबलिंग रेट 20 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे आयुक्त म्हणाले. मुंबईत दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे काही ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळणे शक्त होत नसल्यामुळे केंद्रीय पथकाच्या सुचनेनुसार ‘चेसिंग द व्हायरस’ मोहीम सुरू करण्यात आली असून एका रुग्णामागे पाच जणांऐवजी आता १५ जणांना क्वारेंटाइन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसणार असणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

केवळ 6665 कोरोनाबाधित रुग्णालयात
मुंबईत सध्या 74 हजार खाटा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यातील रुग्णालयांच्या खाटांवर केवळ 6665 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 4 हजार 132 पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेले रुग्ण कोरोना केअर सेंटर – 1 मध्ये आणि 7 हजार 446 लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारेंटाइन आहेत. त्यामुळे केवळ एकूण 18 हजार 242 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या