मुंबई तिहेरी बॉम्बस्फोटातील आरोपीला 14 वर्षांनंतर जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2011 साली मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीची 14 वर्षांच्या कारावासानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. दीर्घ काळ तुरुंगवास आणि खटल्याच्या सुनावणीत झालेला विलंब लक्षात घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने आरोपी नदीम शेख याचा आज जामीन मंजूर केला.

मुंबई तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी शेख याला तपास यंत्रणांनी जानेवारी 2012 साली अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर नदीम याने हायकोर्टात 2022 साली याचिका दाखल केली होती. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने जाहीर केला. आरोपी गेल्या एक दशकाहून अधिक काळ कारागृहात आहे आणि येत्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे त्याला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढय़ाच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

27 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

13 जुलै 2011 रोजी अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरात झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना परिसरात झालेल्या स्फोटांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता, तर 120 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण 11 आरोपींवर यूएपीए आणि मकोकासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.