मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण, महापौर होम क्वारन्टाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’चे वार्तांकन करणाऱ्या मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बहुतांश इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले तरी यातील एकाही पत्रकारामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. महापौर किशोरी पेडणेकर या गेले काही दिवस पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्यांनी होम क्वारन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाविरोधात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईकरांना सेवा देण्यासाठी झटत आहेत. यामध्ये कोरोनाबाबत सर्व प्रकारच्या बातम्या देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार अविरतपणे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून 160 पत्रकार, फोटोग्राफर, कॅमेरामन यांची कोरोना चाचणी नुकतीच करण्यात आली होती. या चाचण्यांचा अहवाल आज आला असून यात 53 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईतील पत्रकारांनीही कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालिकेकडून गोरेगावच्या फर्न हॉटेलमध्ये व्यवस्था

मुंबईत रिपोर्टिंग करणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह सर्व 53 पत्रकारांच्या आरोग्य सुविधेची आणि विलगिकरणाची व्यवस्था गोरेगावमधील फर्न हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांच्या प्रयत्नाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग पत्रकारांची काळजी घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिका प्रशासन पत्रकारांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करीत असल्यामुळे त्यामुळे कोणीही परस्पर हॉटेलवर जाऊ नये असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

महापौर होम क्वारन्टाईन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या होम कोरेन्टाईन झाल्या असून पुढील 14 दिवस त्या घरातूनच कामकाज पाहणार आहेत. त्यांची आणि त्यांच्या वाहनचालकाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, त्या गेले काही दिवस वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. या पत्रकारांपैकी काही पत्रकारांच्या कोरोना चाचण्या आज पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःच होम कोरेन्टाईन होण्याचा निर्णय घेतला असून 14 दिवस त्या महापौर बंगल्यातूनच कामकाज पाहणार आहेत.