
मुंबईत विसर्जनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास लालबागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. अज्ञात कार चालकाने दोन मुलांना चिरडले. या भीषण अपघातात 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साधारण 3 ते 4 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. 2 वर्षांची चंद्रा वजणदार ही तिच्या 11 वर्षीय भाऊ शैलू वजणदार सोबत रस्त्याच्या कडेला झोपली होती. याच दरम्यान एका अज्ञात कार चालकाने त्यांच्या अंगावर कार घातली. या अपघातानंतर त्यांना मदत न करता तो तिथून पसार झाला. त्यामुळे दोन वर्षांच्या चंद्राचा मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेला तिचा भाऊ शैलू वजणदार याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.