ट्युशनला जा म्हटल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून मन हेलावणाऱ्या बातम्या समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तोच आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मुलाने एका क्षुल्लक कारणावरून इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान ही धक्कादायक घटना घडताच कांदिवली पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीसह पती आणि त्यांचा मुलगा मुंबईत कांदिवलीतील एका इमारतीत 57 व्या मजल्यावर राहतात. या अभिनेत्रीचा एकुलता एक मुलगा हा 14 वर्षांचा होता. घटनेच्या दिवशी अभिनेत्रीने मुलाला ट्यूशन क्लासेसला जाण्यास सांगितले. पण मुलाला ट्यूशन क्लासेसला जायचं नव्हतं. आईने क्लासेसला जा सांगितलं म्हणून त्या 14 वर्षांच्या मुलाला राग अनावर झाला. राग अनावर झाल्यामुळे, त्याने टोकाचे पाऊल उचलले. ऐन रागाच्या भरात त्याने 57 व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले.

दरम्यान ही संबंधित अभिनेत्री कोण आहे? किंवा त्या मुलाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. ज्या अभिनेत्रीच्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, ती अभिनेत्री गुजराती सिनेसृष्टीतील असल्याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे.