मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस 7 ऑगस्टपासून धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना साथीच्या काळात प्रवाशांअभावी बंद करावी लागलेली मुंबई सेंट्रल -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस पुन्हा 7 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. ही ट्रेन आठवडय़ातून चार वेळा शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार अशी धावणार आहे.

ट्रेन क्र. 82902/901 ‘तेजस एक्सप्रेस’ या देशातील पहिल्या खासगी ट्रेनला 7 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱया ‘आयआरसीटीसी’कडे या पहिल्या प्रायव्हेट ट्रेनचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे. कोरोना काळात ही ट्रेन पुन्हा एकदा सुरू होत असून कोविड-19 चे व सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग तसेच सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

अंधेरीचा थांबा कायम…

या ट्रेनला अंधेरी रेल्वे स्थानकात नव्याने दिलेला थांबा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांना फायदा तर होईलच शिवाय ज्यांना मुंबई विमानतळावर पुढील प्रवास करायचा आहे त्यांनादेखील अंधेरी येथील थांबा फायद्याचा ठरणार आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ई-तिकिटिंग वेबसाईट www.irctc.co.in आणि ‘आयआरसीटीसी’च्या रेल कनेक्ट अॅपवरून तिकीट बुक करता येऊ शकणार आहे.