
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे विमानतळाच्या ‘फनेल झोन’मधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. ‘फनेल झोन’मधील 400 हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यास नगरविकास विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात निर्माण होणारे चटई क्षेत्र टीडीआर स्वरूपात अन्यत्र वापरण्यास तसेच इमारती भोवतालच्या मोकळय़ा जागेत सवलत देण्याचा दृष्टीने विचार केला जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सांताक्रुझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला पूर्व – पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील परिसर ‘फनेल झोन’मध्ये मोडत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथील झोपडपट्टय़ा आणि इमारतींचा पुनर्विकास नियमाच्या कचाटय़ात रखडला आहे. विमानतळ परिसरात इमारतीच्या उंचीच्या निर्बंधांमुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रात पुनर्विकास करणे अशक्य आहे. एकीकडे निर्बंधामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे, तर दुसरीकडे इमारती जीर्ण झाल्यामुळे रहिवाशीयांसाठी धोकादायक झाल्या आहेत. या परिसरातील झोपडपट्टी आणि इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलने केली होती. विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
‘फनेल झोन’ मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार ते नऊ अतिरिक्त चटई क्षेत्रफळ प्रस्तावित करणारा पर्याय पालिकेने तयार केला होता, मात्र या परिसरात इमारतीच्या उंचीवरील मर्यादेमुळे हे चटई क्षेत्र वापरता येणे शक्य नव्हते. त्यामुळे आता नव्या पर्यायाचा शोध सुरू आहे. शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी असलेल्या विकास नियंत्रण नियमावली 33(7) च्या धर्तीवर यासाठी नवी नियमावली करण्याचे ठरविण्यात आल्याचे कळते.
या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्र वजा जाता उर्वरित चटई क्षेत्र टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. नव्या विकास आराखडय़ात त्याबद्दल उल्लेख केला जाईल, अशी चर्चा होती. परंतु नव्या विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद आणण्यास नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत हा परिसर ‘एअरपोर्ट फनेल बाधित’ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तशा सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत. नगरविकास विभागातील अधिकाऱयांनी त्यास दुजोरा दिला आहे.































































