महायुतीचे शिवसेना शिलेदार जल्लोषात अर्ज दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

महायुतीतील शिवसेनेच्या मुंबईतील शिलेदारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून होणार आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे हे सोमवारी 8 एप्रिल रोजी तर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर हे 9 एप्रिलला आपले अर्ज दाखल करणार आहेत.

महायुतीचे दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत हे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सोमवारी सकाळी 9 वाजता फोर्ट शिवसेना शाखा येथे मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदकार राहुल रमेश शेवाळे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे उमेदकारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी सकाळी 11 वाजता सीएसटी, जीपीओ कार्यालयाजवळ भेटणार आहेत. 11.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही उमेदवार आपले अर्ज दाखल करतील.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गजानन कीर्तिकर हे मंगळवार 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व) येथे निवडणूक अर्ज सादर करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, विभागप्रमुख व आमदार अनिल परब, राज्यमंत्री रवींद्र वायकर, विद्या ठाकूर, विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, रिपाइं (ए)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, शिवसेना महिला विभाग संघटिका राजुल पटेल, साधना माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कीर्तिकर यांची प्रचार रथफेरी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचार रथफेरीस रविवारी सुरुवात झाली. जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील प्रभाग क्र. 52 मधील गोरेगाव पूर्व येथील साईबाबा कॉम्प्लेक्स, गोकुळधाम, ओबेरॉय टॉवर्स या परिसरातील जनतेचा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना भरघोस प्रतिसाद लाभला. प्रचार फेरीत गजानन कीर्तिकर यांच्यासमवेत विभागप्रमुख व आमदार सुनील प्रभू, भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, शाखाप्रमुख संदीप गाढवे, काशीनाथ परब यांच्यासह कायकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.