
मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांत कोरोना नियंत्रणात येत असतानाच आता डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण सापडू लागल्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात चार दिवसांपूर्वी डेल्टाच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली असतानाच मुंबईत आज आणखी 7 रुग्ण तर राज्याच्या इतर भागांत 13 रुग्ण सापडल्याने राज्यात डेल्टा प्लसची एकूण रुग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे.
कोरोना नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. आज सीएसआयआरआयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्ण शोधले आहेत. मुंबईत 7, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.
या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत 65 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 मुले असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.
मुंबई महापालिका सतर्क
डेल्टा प्लस व्हेरिएंट तिसऱया लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकते, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरात विविध ठिकाणाहून लोक रोज ये-जा करीत असल्याने याचा संसर्ग पसरू शकतो. कोरोना विषाणूचे बदलते स्वरूप आणि वेगाने पसरणारा घातक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने पालिका सतर्क झाली आहे. कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांच्या चाचण्या करण्यात येणार असून अमेरिकेतून 6 कोटी रुपयांची मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.
असे आढळले आहेत एकूण रुग्ण
n मुंबई – 13 n ठाणे – 5 n जळगाव – 13 n रत्नागिरी – 11 n पुणे – 6
n पालघर-3 n नांदेड – 2 n गोंदिया – 2 n रायगड – 2 n सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, संभाजीनगर, कोल्हापूर, बीड, चंद्रपूर, अकोला – प्रत्येकी 1
n राज्यात एकूण – 65




























































