
एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये फरसबी आणि वाटाणा या दोन भाज्यांनी सेंच्युरी ठोकली आहे. या दोन्ही भाज्यांचे दर अनुक्रमे १२० आणि ११० रूपये किलो झाले आहेत. शेवगा शेंग, भेंडी, घेवडा, दोडका या भाज्यांनाही भाव खाल्ल्यामुळे त्यांचे दर ४० ते ८० रूपये किलो यादरम्यान गेले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दराचा आलेख चढता होत चालला आहे. त्यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून पडले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला एपीएमसी मार्केटमध्ये सर्वच भाज्यांचे दर 50 ते 60 रूपये किलोच्या आत होते. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊ लागल्यामुळे आता हे दर विजेच्या वेगाने वाढू लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 60 रूपये किलो या दराने विकला जाणारा वाटाणा आता थेट 110 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. फरसबीचा दरही दुप्पटीने वाढला आहे. शेवगा शेंग, भेंडी, घेवडा, दोडका, या भाज्या महाग झाल्या आहेत. कोथिंबीर आणि मेथी यांचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर होते. 10 ते 15 रुपये जुडी या दराने त्याची विक्री होत होती. मात्र आता कोथिंबीर 25 ते 30 आणि मेथी 30 ते 35 जोडी या दराने विकली जात आहे.
परराज्यातील आवक घटली
सध्या एपीएमसी मार्केट मध्ये आपल्या राज्यातील भाजीपाला येत आहे. परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचे आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने दडी मारल्यामुळे त्याचाही विपरित परिणाम भाजीपाल्याच्या पिकावर होणार आहे. परिणामी वाटण्या सारख्या भाज्या आणखी तेजीत येण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.



























































