
सामना प्रतिनिधी। मुंबई
‘माझे पक्षात कोणी ऐकत नाही, मीसुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीत आहे’ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिपने शनिवारी खळबळ उडाली. चंद्रपुरात काँग्रेसकडून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे तेथील कार्यकर्त्यांमधला असंतोष आणि अशोक चव्हाण यांची हतबलता या क्लिपमुळे चव्हाटय़ावर आली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचीच पत घसरलीय की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसने विनायक बांगडे यांना तिकीट दिले आहे. बांगडे हे तगडे उमेदवार नसल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत असून त्यातील एका कार्यकर्त्याने ही नाराजी दूरध्वनीवरून अशोक चव्हाण यांच्या कानावर घातली. यावर अशोक चव्हाण यांनी माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही, तुम्ही मुकुल वासनिक यांच्या कानावर घाला. त्यांना सांगा मी तुमच्यासोबत आहे असे सांगतानाच आपणच राजीनामा द्यायच्या मनस्थितीत असल्याची उद्विग्नता व्यक्त केली आहे. मुकुल वासनिक कोण आपल्या हातात अख्खा महाराष्ट्र आहे, या कार्यकर्त्याच्या वक्तव्यावर जे खरं आहे ते बोलावं लागतं, अशी अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्याने ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. बाळू धानोरकर यांना तिकीट देण्यासाठी आपण अनुकूल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वडेट्टीवारांना शब्द टाकायला सांगा, असे सांगून अशोक चव्हाण यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे. अखेर या कार्यकर्त्यालाच विनायक बांगडे यांना तिकीट मागे घ्यायला सांगा, असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही
अशोक चव्हाण यांनी या ऑडिओक्लिप बाबत इन्कार केलेला नाही. मात्र अशा प्रकारे खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे ही बाब खरी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे. मी क्लिप ऐकलेली नाही. पण तिथे कार्यकर्ते नाराज आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.































































