
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या एक न्यायालयाने 15 वर्षे तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. टेरर फंडिंग प्रकरणातील सरकारची याचिका निकालात काढत न्यायालयाने हाफिजला तुरुंगात धाडण्याचा आदेश दिला आहे.
हिंदुस्थानात जिहादी हल्ले घडवण्याचे कट रचणाऱया 70 वर्षीय सईदला यापूर्वीही अशाच 4 प्रकरणांत 21 वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना निधी पुरवण्यासह अन्य एकूण 5 प्रकरणांत हाफिजला आतापर्यंत 36 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयांनी ठोठावली आहे. सईद सध्या लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे.
दहशतवादी हाफिज सईदला गेल्या वर्षी 17 जुलैला अटक झाली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच पैद आहे. फेब्रुवारीत त्याला टेरर फंडिंगप्रकरणी 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिवाय अजून दोन प्रकरणांत 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. हाफिजवर टेरर फंडिंगसह मनी लॉण्डरिंग आणि अवैध कब्जा मिळवण्यासह 23 गुन्हे दाखल आहेत.
























































