नव्या वर्षात मुंबई बँकेसह चार सहकारी फेडरेशनच्या निवडणुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबरच चार सहकारी फेडरेशनच्या निवडणुकीचा बार नव्या वर्षात उडणार आहे. ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपत आहे त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार खात्याच्या मुंबई विभागीय सह निबंधक कार्यालयाने कंबर कसली आहे. त्यानुसार मतदार याद्या बनवण्याचे काम सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे सहकार विभागाने डिसेंबरअखेर सर्वच निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यानंतर आता जानेवारीपासून निवडणूक कामाची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामध्ये मुंबई जिल्हा बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सहकारी कन्झ्युमर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी मच्छीमार महासंघ, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या निवडणुका मेअखेर पूर्ण केल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहनिबंधक संतोष पाटील यांनी सांगितले.

जुलैमध्ये साखर संघाची निवडणूक
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी साधारणपणे जुलैमध्ये निवडणूक होणार आहे, तर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघासाठी जूनमध्ये निवडणूक होणार आहे.