मुंबईत घामाच्या धारा… मेट्रोत कर्मचाऱ्यांना ओआरएस, लिंबूपाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई, कोकणात अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहेत. मुंबई मेट्रोतील कर्मचाऱ्यांना ओआरएस आणि लिंबूपाणी कंपनीतर्फे पुरवले जात आहे. मुंबईत उन्हाचे चटके जाणवत नसले तरीही घामाच्या धारा वाहत असल्यामुळे अंगातून पाणी निघून जाते. वारंवार तहान लागते. परिणामी डिहायड्रेशन होते आणि भोवळ येण्यासारखे प्रकार घडतात. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी लिंबूपाणी आणि ओआरएसची व्यवस्था केली आहे.

पोलिसांना दिवस-रात्र उन्हातान्हात हिंडावे लागते. 24 तास डय़ुटी बजावावी लागते. त्यामुळे सातत्याने पाणी लागते. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पोलिसांच्या गाडय़ांमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा स्टॉक भरल्याचे पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले.

सकाळी 9 ते 4 दरम्यान टॅक्सी तापते

सकाळी 9 ते सायंकाळी 4 दरम्यान टॅक्सीचा पत्रा तापलेला असतो. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होतात. पाणीही गरम होते. ते थंड रहावे यासाठी बाटलीला कपडा गुंडाळावा लागतो. थोडेसे गार पाणी मिळते तेवढाच काय तो दिलासा. प्रवाशी काही काळ गाडीत बसतात. पण, आम्हाला 24 तास या उकाडयात घालवावे लागतात, असे मुंबईतील सुरेश कुमार या टॅक्सीवाल्याने सांगितले.

दुपारी 12 वाजल्यापासून ज्युस सेंटरवर गर्दी

कुर्ला रेल्वे स्थानकात गलीच्छ पध्दतीने लींबू सरबत बनवण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील ज्युस सेंटर्स बंद करण्यात आली. मात्र, मुंबईत मोठया संख्येने ज्युस सेंटर्स आहेत. अनेक ज्युस सेंटर्सवर स्वच्छतेची काळजीही घेतली जाते. दादरच्या अशाच एका रेणूका ज्युस सेंटरवर दुपारी 12 वाजल्यापासून मोठया संख्येने ग्राहक येत असल्याचे येथील एक कर्मचारी आदिल याने सांगितले.

सकाळी 9 वाजल्यापासून वातावरण गरमागरम

सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वातावरण गरम राहत आहे. घामाघूम झाल्यामुळे सारखे पाणी लागते. दुपारी जेवल्यानंतर तर लिंबूपाणी आणि ओआरएस लागतेच लागते. नुसते पाण्याने काहीच होत नाही. लिंबूपाणी किंवा ओआरएस मिळाल्याने काम करण्याची ताकद मिळते, असे मेट्रोचे कर्मचारी ताहीर हुसेन यांनी सांगितले.