
धुलीकण आणि धुरक्यामुळे मुंबईतील हवा दिवसेंदिवस खराब होत असून आज सकाळी 10 वाजेपर्यंत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) 300 ची पातळी गाठली. दिल्लीत सकाळी 10 वाजेपर्यंत ही पातळी 249 इतकी होती. त्यामुळे मुंबई हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले असून मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. मुंबईसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
मुंबईत गेल्या वर्षी सर्वाधिक हवा प्रदूषणाची समस्या नोव्हेंबर महिन्यात हिवाळा सुरू झाल्यावर निर्माण झाली होती. मात्र या वर्षी एक वर्ष आधीच मुंबईतील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. 201 ते 300 हवेचा गुणवत्ता निर्देशांक हे खराब हवा असल्याचे दर्शवते तर 301 ते 500 दरम्यान हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा हवेची गंभीर स्थिती असल्याचे दर्शवतो. मुंबईने आज 300 चा टप्पा ओलांडला आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम, टाटा पॉवरला नोटिसा
चेंबूरच्या माहुल येथे पर्यावरण कायद्यांचे उलंघन केल्याप्रकरणी आज हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स, अंबापाडा या उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत.



























































