
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत गुरुवारी बेस्ट बस आणि एर्टिगा कारमध्ये जोरदार धडक झाली. आदर्श नगर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी बस क्र. 251 ही गाडी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बोरिवलीकडे चालली होती. बस छोटा कश्मीर (गोरेगाव आरे कॉलनी) येथे आली असता तिची समोरून आलेल्या एर्टिगा कारला धडक बसली. या अपघातात बसचालकाच्या उजव्या पायाला किरकोळ जखम झाली असून एर्टिगा कारच्या चालकाच्या उजव्या खांद्याला किरकोळ मार लागला. कारचालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले होते. बसचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.





























































