बायोमेडिकल कचऱ्याचा धोका टाळण्यासाठी मायक्रोवेव्ह प्रणाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱया बायोमेडिकल कचऱयाचा धोका टाळण्यासाठी पालिका ‘मायक्रोवेव्ह प्रणाली’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामध्ये पालिकेची मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांमधील कचऱयाचे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. कचरा निर्माण होणाऱया ठिकाणीच निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच पालिकेकडे असणाऱया कंत्राटदाराच्या माध्यमातून कचऱयाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या कार्यक्षेत्रात मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि दवाखाने अहोरात्र काम करीत आहेत. या ठिकाणी निर्माण होणाऱया बायोमेडिकल कचऱयाची विल्हेवाट पालिकेच्या माध्यमातून लावण्यात येते. बायोमेडिकल कचऱयामध्ये रक्त नमुन्याच्या बाटल्या, सीरिंज, ऑपरेशन थिएटरमध्ये कापलेले मानवी शरीराचे भाग अशा विविध प्रकारच्या कचऱयाचा समावेश होतो. मात्र साथीचे आजार आणि विविध गंभीर आजारांमध्ये बायोमेडिकल कचऱयाची विल्हेवाट लागेपर्यंत खबरदारी घेण्यात येत असली तरी या कचऱयाच्या संपर्कात येणाऱया कर्मचाऱयांना धोका असतो. त्यामुळे विल्हेवाटीसाठी जाण्याआधी कचरा निर्माण होणाऱया ठिकाणीच निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य बनले आहे. या कामासाठी 13 कोटी 8 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

…म्हणूनच घेतला निर्णय

सद्यस्थितीत कोरोनासारख्या आजारात पीपीई किटसह इतर बायोमेडिकल कचऱयाचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय केंद्र सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 1998 संदर्भात 28/4/2016च्या अधिसूचनेनुसार बायोमेडिकल कचऱयाची विल्हेवाट लावण्यापूर्वी हा कचरा निर्माण होणाऱया ठिकाणी निर्जंतुक करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर एपंदरीत सर्व रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्या त्या ठिकाणी सर्वात आधी अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.