पालिकेचा नियंत्रण कक्ष होणार हायटेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आणीबाणीच्या विविध प्रसंगांत मदतकार्य करून मुंबईकरांची जीवित आणि वित्तहानी टाळणारा पालिकेचा नियंत्रण कक्ष आता अधिक हायटेक होणार असून आणीबाणीच्या वेळी संपर्कासाठी डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणालीचा (डीएमआर) वापर आता केला जाणार आहे. त्यामुळे विनाअडथळा संपर्क होणार असून संभाव्य धोके टाळता येणार आहेत.

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती यशस्वीपणे हाताळण्याची सक्षम यंत्रणा पालिकेकडे आहे. या आपत्कालीन यंत्रणेचा कणा पालिकेचा नियंत्रण कक्ष असून आणीबाणीच्या वेळी मदतकार्य आणि संपर्कासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षात फोन, हॉटलाइन आणि ऑनालॉग बिनतारी संदेशवहन प्रणाली (व्हीएचएफ) वापरली जाते. त्याचबरोबरीने आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे विभाग कार्यालये, रुग्णालये, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही बिनतारी संच बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबरीने वॉकीटॉकी संच देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागात ऑनालॉग बिनतारी प्रणाली 2009 पासून कार्यरत असून या प्रणालीचा 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ही प्रणाली बदलून आता अत्याधुनिक अशी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मोबाईल रेडिओ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत.

‘डीएमआर’ प्रणालीतील उपकरणे

आपत्कालीन व्यवस्थापन विभाग डीएमआर प्रणाली असलेले 65 बिनतारी संच, वाहनांवर बसवण्यासाठी 60 संच, इतर महत्त्वाच्या विभागांना वापरण्यासाठी 201 वॉकीटॉकी संच, टेलिस्कोपिक अँटेना, 5 रिपिटर संच तसेच प्रोग्रॅमिंग आणि डीसपॅचर खरेदी करणार असून त्यासाठी ई निविदा मागवून पंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.