कस्तुरबात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ‘डेल्टा प्लस’च्या चाचण्या!

कोरोनाचे बदललेले घातक स्वरूप असलेल्या ‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अमेरिकेहून मागवलेले साडेसहा कोटींचे मशीन मुंबई विमानतळावर आज पोहोचले. त्यामुळे चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात पुढच्या आठवडय़ापासून डेल्टा प्लसच्या चाचण्या सुरू होणार असून त्याचा अहवाल दोन ते चार दिवसांत मिळणार आहे. डेल्टा प्लसचे मशीन आल्यामुळे पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ संपणार आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे बदललेले स्वरूप असलेल्या डेल्टा प्लसचा धोका निर्माण झाला आहे. ‘डेल्टा प्लस’ संशयितांचे सुमारे 600 अहवाल पालिकेला मिळाले आहेत, मात्र मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जून महिन्यात डेल्टा प्लसच्या चाचण्या करण्यासाठी अमेरिकेहून साडेसहा कोटींचे मशीन मागवले होते. ते आज मुंबई विमानतळावर पोहोचले. कस्टम तसेच इतर चेकिंग झाल्यावर ही मशीन गुरुवारपर्यंत मुंबई महापालिकेकडे सोपवले जाणार आहे. त्यानंतर दोन दिवस या मशीनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवडय़ापासून म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून कस्तुरबामध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये ज्या महिला डॉक्टरला दोन लस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे तिचे स्वॅब सॅम्पल आम्ही गोळा केले असून त्याची तपासणीही कस्तुरबामध्ये येणाऱया मशीनमध्ये केली जाणार आहे. या मशीनमुळे कमी वेळात अधिक योग्य उपचार करणे शक्य होणार आहे तसेच कोरोना विषाणूचा कोणता म्युटेंट आहे हेही तातडीने समजणार आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

आपली प्रतिक्रिया द्या