मुंबईत विनामास्क व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱया व्यक्तीविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंड न भरता पोलीस आणि पालिका कर्मचाऱयांशी हुज्जत घातल्यानंतर अखेर नाइलाजाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे मास्क न घातल्यामुळे दाखल करण्यात आलेला मुंबईतील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱयांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या एम/पश्चिम वॉर्डमधील चेंबूर परिसरात आज पालिकेच्या पाच जणांच्या पथकातर्फे विनामास्क असलेल्यांवर कारवाई सुरू होती. यावेळी दुचाकीवरून जाणाऱया राहुल वानखेडे (28) या तरुणाने मास्क घातला नव्हता. मात्र त्याच्याबरोबर असलेल्या मित्राने मास्क घातला होता. याबाबत पालिका पथकाने त्याला थांबवून मास्क का घातला नाही, याचा जाब विचारला. मात्र, ‘मी कोरोना चाचणी केली आहे. मला कोरोना नाही. तसेच कोणतीही लक्षणे नाहीत त्यामुळे मास्क लावला नाही,’ असे उत्तर दिले. यावर पालिका कर्मचाऱयांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असल्याचे सांगून दंड भरण्यास सांगितले. यावर राहुलने दंड भरण्यास नकार दिला आणि पोलीस व पालिका कर्मचाऱयांशी हुज्जत घातली. यावर पोलिसांनी त्याला गोवंडी पोलीस ठाण्यात नेले. तिथेही त्याला पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दंड न भरल्यामुळे त्याच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला.