शांततेत मतदान होण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

bmc election 25,000 cops deployed in mumbai for peaceful voting

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळित व कुठल्याही गडबडीविना पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुबार मतदान किंवा मतचोरी होण्याची दाट शक्यता असल्याने हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. या दोन्ही पक्षांची भरारी पथके सकाळी सहा वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर खडा पहारा देणारा आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. 10 अपर पोलीस आयुक्त, 33 उपायुक्त, 84 सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन हजारांहून अधिकारी तर 25 हजारांहून अधिक अंमलदार असा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटीची पथके, बीडीडीएस पथके, आरसीपी प्लाटून, होमगार्डदेखील बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी ठिकठिकाणी पथसंचलन केले. फौजफाटय़ासह ठिकठिकाणी फिरून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. कोणीही कायदा हाती घेऊ नये, काही गडबड किंवा संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांकडे संपर्क साधा असेही यावेळी सांगण्यात आले.