
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे पावित्र्य राखून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला,’ ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मुंबईकरांनी मंगळवारी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मुंबईतील 70 नैसर्गिक तर 199 कृत्रिम तलावांत मिळून एकूण 1 लाख 35 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव शांततेत पार पडल्यामुळे आणि मिळालेल्या सहकार्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशोत्सव समन्वयक समिती तसेच भाविकांचे महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आभार मानले.
यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता योग्य ती खबरदारीदेखील बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने मुंबई महानगरपालिकेने कोरोनाबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेत निरनिराळ्या उपाययोजना केल्या होत्या. दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या श्री गणरायाला मुंबईकरांनी मंगळवारी भावपूर्ण वातावरणात आणि शांततेत तसेच सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निरोप दिला.
पालिकेची चोख व्यवस्था
संपूर्ण गणेशोत्सवामध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती सर्व यंत्रणा उभी केली होती. 70 नैसर्गिक चौपाटय़ा आणि तलाव तसेच 199 कृत्रिम तलावांजवळ मूर्ती संकलन करून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. विविध चौपाटय़ांवर 786 स्टील प्लेट लावण्यात आल्या होत्या. एकूण 237 स्वागत कक्ष आणि 219 नियंत्रण कक्ष उभारले होते. 812 जीवरक्षक, 142 मोटरबोट, 154 प्रथमोपचार केंद्र, 81 रुग्णवाहिका, 130 तात्पुरती शौचालये, 420 निर्माल्य कलश, 338 निर्माल्य वाहन, 3 हजार 658 प्रखर झोताचे विद्युत दिवे, 363 सर्च लाइट, 47 निरीक्षण मनोरे, 43 जर्मन तराफा आदींचा त्यात समावेश होता. ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार विद्युत तसेच संरक्षक कठडे यांची व्यवस्था करण्यात आली होती.




























































