
मुंबईत वाहनधारकांना लवकरच मोबाईलवर पार्किंग बुक करता येणार आहे. पार्किंगसाठी पालिका एक अत्याधुनिक मोबाईल अॅप विकसित करीत आहे. यासाठी ‘टाटा’ विज्ञान संस्थेची मदत घेतली जाणार आहे. एप्रिल 2024 पर्यंत ही कार्यवाही पूर्ण होऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय वाहतुकीलाही शिस्त लागणार आहे. यासाठी पालिका स्वतंत्र पार्पिंग प्राधिकरण तयार करीत आहे.
या सुविधेमुळे पार्किंगसाठी जागा शोधत आता गाडी फिरवत बसण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती पोहचण्यापूर्वीच समजणार असून मोबाईलवरूनच पार्किंग बुक करता येणार आहे. यासाठी पालिका मुंबईतील वाहनतळांचे नव्याने नियोजन करत आहे. त्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त केली आहे. या समितीचे काम एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. शिवाय आता पार्किंगसाठी वाहनतळ प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुरुवातील वाहनतळे निश्चित करणे, विभागनिहाय आराखडा तयार करणे, मोबाईल ऑप्लिकेशनसाठी आवश्यक माहिती संग्रहित करणे, वाहनतळांचे जीआयएस मॅपिंग करणे, वाहनतळासाठी धोरण तयार करणे आणि इतर आवश्यक माहिती तयार करण्यासाठी तज्ञांनी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे वाहतूक क्षेत्रातील तज्ञ, नगररचनाकार, जीआयएस प्रणालीतील तज्ञ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वाहतूकतज्ञ अशोक दातार, शिरीश जोशी यांच्यासह पालिकेचे निवृत्त अधिकारी निता निफाडे, प्रशांत मोरकर यांची नियुक्ती केली आहे. तर निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांची वाहनतळ प्राधिकरण मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व तज्ञांच्या शुल्कापोटी पालिका 4 कोटी 70 लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
कोविडमुळे काम रखडले
कोविडच्या पहिल्या लाटेचाही या कामावर परिणाम झाला आहे. हे काम सुरू असताना कोविड लॉकडाऊनमुळे मे 2020 मध्ये हे काम थांबविण्यात आले. मात्र नंतर हे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि टाटा समाज विज्ञान संस्थेने योग्य पद्धतीने पूर्ण केले असल्याचेही पालिकेने या प्रस्तावात नमूद केले आहे.
विभागानुसार आराखडा
- नेमण्यात आलेले तज्ञ विभागानुसार पार्किंगचा आराखडा तयार करणार आहेत. यासाठी निश्चित झालेल्या जागेचे मॅपिंग करून ती जीआयएस पध्दतीने संग्रहित करण्यात येणार आहे. त्याच वापर वेबबेस पार्किंग आणि मोबाईल ऑप्लिकेशन बनविण्यासाठी होणार आहे.
- विभागातील गरजेनुसार वाहनांच्या प्रकारानुसार जागा निश्चित केल्या जाणार आहेत. म्हणजे ज्या भागात अवजड वाहनांचा वावर असेल तेथे अवजड वाहानांना प्राधान्य, ज्या भागात लहान वाहनांचा वावर असेल तेथे लहान वाहनांसाठी जागा अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
































































