
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिका विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच 27 वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गणवेश, बूट-मोजे, पावसाळी सँडल, दप्तरे, वह्या, रेनकोट, छत्री या वस्तू देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पाण्याची बाटली, जेवणाचा डबा व स्टेशनरी या वस्तूंकरिता ‘डीबीटी’अंतर्गत थेट हस्तांतरण अनुदान देण्यात येणार आहे. पालिका शाळांमधील 3,27,976 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना 2007 पासून 27 शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या वर्षी पालिकेच्या शाळा 17 जून रोजी सुरू होणार आहेत. या वर्षीपासून नवीन प्रस्तावानुसार निविदा प्रक्रियेद्वारे गणवेश, बूट व मोजे, पावसाळी सँडल, शाळेची बॅग, वह्या, रेनकोट घेण्यात यावे, तर पाण्याची बाटली, जेवणाचा डबा व स्टेशनरी या वस्तूंकरिता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव शिक्षण समितीमध्ये मंजुरीसाठी मांडला जाईल.
असे मिळणार विद्यार्थ्यांना अनुदान
विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत अथवा नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागणार. सर्व विद्यार्थ्यांची नावे व बचत खाते क्रमांकासह यादी शाळेने संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी. अनुदानासाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी रक्कम संबंधित विभागीय लेखा अधिकारी यांच्यामार्फत बँक खात्यात वळती करावी.
थेट अनुदानासाठी असा होणार खर्च
शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये 18 कोटी तीन लाख 40 हजार 854 रुपये तर 2020-2021 या आर्थिक वर्षात 18 कोटी 89 लाख 28 हजार 515 रुपये असे एकूण 36 कोटी 92 लाख 69 हजार 369 रुपये.

























































