
इंग्लंडमधून गेल्या महिनाभरात मुंबईत परतलेल्या चार हजार प्रवाशांची यादी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिली असून पालिकेने त्यांच्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या सर्व प्रवाशांची पुन्हा आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार असून लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह-संशयितांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. पालिकेच्या प्रमुख कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली.
मुंबई-महाराष्ट्रात कोरोना आता चांगलाच नियंत्रणात आला असला तरी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणाहून मुंबईत हजारो प्रवासी परतले असल्याने खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून जोरदार उपाययोजना करण्यात येत आहे.
इंग्लंडमध्ये जनुकीय बदल दाखवलेला कोरोना व्हायरस हा वेगाने पसरत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर महिनाभरात परतलेल्या प्रवाशांची माहिती राज्य सरकारकडून पालिकेला देण्यात येत आहे. यामध्ये याआधी दीड हजार आणि आज सुमारे अडीच हजार प्रवाशांची यादी पालिकेला मिळाली असून त्या दृष्टीने पालिकेने काम सुरू केले असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. या प्रवाशांसह त्यांच्या निकट संपका&तील व्यक्तींची माहितीही घेतली जात असून संशयित प्रकरणात आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
…म्हणूनच पालिका सतर्क
इंग्लंडमध्ये जनुकीय बदल दाखवलेला विषाणू वेगाने पसरणारा आहे. तसेच याचा धोकाही जास्त असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात इंग्लंडहून परतलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, 23 डिसेंबरपासून इंग्लंडहून येणारी विमाने बंद करण्यात आली असून युरोपीय देश इटली, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि मध्य पूर्व आशियातून येणाऱया प्रवाशांना हॉटेलमध्ये सक्तीने क्वारंटाइन करण्यात येत आहे. या प्रवाशांची पाचव्या ते सातव्या दिवशी आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
23 डिसेंबरपर्यंतच्या प्रवाशांचा शोध
कोरोनाचा नवा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून परतलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
या चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमधील कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे याची तपासणी केवळ पुण्यात सुविधा असलेल्या एनआयव्हीकडेच करण्यात येते.

























































