‘बविआला कुणी निशाणी देता का निशाणी…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वसई

गेली 20 वर्षे बहुजन विकास आघाडी पक्षाकडे असलेली शिट्टी ही निशाणी बहुजन महापक्षाने पळविल्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्यावेळी बविआवर ‘कुणी निशाणी देत का निशाणी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर हात, घडय़ाळ, विळा यापैकी एखादी निशाणी मिळते का याचीही चाचपणी सुरू केली आहे. एकूणच यावेळच्या निवडणुकीत उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बहुजन विकास आघाडीची ‘शिट्टी’ वाजली आहे .

वसई-विरारमध्ये गेली तीन दशके बविआची सत्ता आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवली होती. नंतरच्या काळात एक निवडणूक अपक्ष म्हणून त्यांनी लढवली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पक्ष स्थापन करून ‘शिट्टी’ या चिन्हावर गेली 20 वर्षे निवडणुका लढल्यानंतर ‘शिट्टी’ हीच या पक्षाची मुख्य ओळख ठरली. मात्र आता बहुजन महापक्षाने शिट्टी चिन्हाची केंद्रीय स्तरावर नोंदणी केल्यामुळे बविआची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची असा प्रश्न उभा ठाकला आहे.

प्रश्न अस्तित्वाचा
लोकसभा निवडणुकीत 56 पक्षांच्या महाआघाडीसोबत बविआ असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकप पक्षाचा पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे या तीन राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांपैकी एका पक्षाचे चिन्ह वापरून ही निवडणूक बविआला लढवावी लागणार आहे किंवा आपल्या बहुजन विकास आघाडी या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागेल.

चांगलीच अडचण
बविआने अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र प्रचार सुरू केला आहे. आता कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची असा प्रश्न पक्षापुढे आहे. बहुजन महापक्षाचे शमशुद्दीन खान यांनी आधीच ‘शिट्टी’ या निशाणीवर पालघरमध्ये उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्याने बाविआची चांगलीच अडचण झाली आहे.

सोमवारी अर्ज भरणार; चारजण इच्छुक

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी आमचा उमेदवार

8 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे. चिन्हाबाबत महाआघाडीतील इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. निशाणी ही लोकशाही मार्गाने मिळते. कार्यकर्त्यांचेही मत जाणून घेत आहोत. सध्या चारजण इच्छुक आहेत. त्यात बळीराम जाधव, मनीषा निमकर, राजेश पाटील व चंद्रकांत खुताडे हे इच्छुक आहेत.-हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी