भायखळ्यातील बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मोबाईल व्हॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा परिसरातील महिलांना स्वयंरोजगारासाठी आता मोबाईल व्हॅनचा पुरवठा करण्यात येणार आहे. टाटा एसीई गोल्ड प्रकारच्या गाडय़ांवर महिला फळ, भाज्या आणि किराणा सामानाची विक्री करून व्यवसाय करू शकणार आहेत. शिवसेनेच्या पाठपुराव्याने होणाऱया या उपक्रमामुळे गोरगरीब महिलांना हक्काचा रोजगार मिळणार आहे.

बचत गटांना हक्काचा रोजगार देण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रभाग क्र. 209 व परिसरातील महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मोबाईल व्हॅनचा पुरवठा करावा असा प्रस्ताव मांडला होता. यानुसार मोबाईल व्हॅन वाटपासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. या उपक्रमात 30 महिला बचत गटांना या वाहनांमधून फळ, भाज्या आणि इतर पदार्थांची विक्री करता येणार आहे. तसेच इतर व्यवसायसाठीही ही वाहाने वापरता येणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना लॅपटॉप, हायमास्ट दिवे, सीसीटीव्ही

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागणीनुसार प्रभाग 207, 208, 209, 210 शालेय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर्स-लॅपाटॉपचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रभाग 209 मध्ये विविध ठिकाणी 80 लिटर क्षमतेचे 80 खतनिर्मितीचे डबे दिले जाणार आहेत. यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय प्रभागात विविध ठिकाणी हायमास्ट प्रखर दिवे, व्यायामाच्या साहित्याचेवाटप, विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अशी कामेही करण्यात येणार आहेत. अशा विविध कामांसाठी 12 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना आज स्थायी समितीची मंजुरी मिळाली.