
सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक ब्रिजला पाडून चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अखेर त्याचे काम सुरू झाले आहे. 1879 साली बांधलेल्या त्यानंतर पुन्हा 1923 मध्ये पुनर्बांधणी झालेल्या तब्बल 141 वर्षे जुन्या उड्डाण पुलाला अनेक अडथळ्यांच्या शयर्तीनंतर आता अखेर मुहूर्त मिळाला आहे. या पुलांच्या बांधणीला मध्य रेल्वेच्या सहकार्याने नुकतीच सुरूवात झाली असून येत्या रविवारी मध्य रेल्वेने महत्वाच्या अभियांत्रिकी कामांसाठी 5.30 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानचा आणि माझगाव परिसरातील रहिवाशांना रहदारीसाठी महत्त्वपूर्ण असणार्या हँकॉक ब्रिजच्या पाडकामाला चार वर्षे उलटले तरी मुहूर्त मिळाला नव्हता. या ठिकाणच्या शहरी हद्दीतील बांधकामांमुळे अडथळे आले होते. मध्य रेल्वेने 2015 मध्ये हा ब्रिज धोकादायक ठरविला. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये तो तोडण्यात आला. या पुलाचा पहिल्या टप्प्यातील गर्डर पालिकेने जून महिन्यात लॉकडाऊनदरम्यान माझगाव पुर्व दिशेकडून रेल्वे ट्रॅकवर पुढे सरकविण्यास सुरूवात केली होती. या ब्रिजसाठी पालिकेने 52 कोटींचे टेंडर काढले आहे. आता इतर गर्डर सकरविण्यासाठी अन्य कामांसाठी मध्य रेल्वेने रविवार 26 जुलै रोजी सकाळी 8.40 ते 2.10 दरम्यान साडे पाच तासांचा ब्लॉक घेतला आहे.




























































