
शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग असलेल्यांची मध्य रेल्वेकडून कुचेष्टा सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गुरुवारी रात्री 10.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 9 वरून चेन्नईसाठी मेल एक्प्रेस सुटली. मात्र सदर गाडीला दिव्यांगांसाठी असलेली बोगी चक्क फलाट संपल्यानंतर पुढे असलेल्या ट्रकमध्ये भायखळय़ाच्या दिशेला लागली होती. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. त्यांना सहप्रवाशांनी ट्रकमध्ये आणून चक्क उचलून गाडीत चढवले. यावेळी दिव्यांगांना मरणयातना सोसाव्या लागल्याने त्यांनी रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत संताप व्यक्त केला.
मध्य रेल्वेकडून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चेन्नईसाठी मेल एक्प्रेस सुटते. सदरची गाडी याआधी सर्वात लांब असलेल्या फलाटावरून सोडली जात होती. तसेच गाडीला भायखळय़ाच्या दिशेला इंजिननंतर पहिलाच दिव्यांगांसाठीचा डबा असतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून कमी लांबीच्या फलाट क्रमांक 9 वरून ही गाडी सोडली जात आहे. प्रवासी संख्या जादा असल्याने गुरुवारी या गाडीला दोन अतिरिक्त डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे इंजिन आणि त्याला लागून असेलेला दिव्यांगांचा डबा फलाटाच्या खाली लागला होता. रेल्वेने गाडीला अतिरिक्त डबे जोडताना दिव्यांगांच्या डब्याचा विचार करणे गरजेचे होते. तसे न करता गाडीला मागील बाजूला अतिरिक्त डबे जोडल्याने पुढच्या बाजूला असलेले इंजिन आणि दिव्यांगांचा डबा फलाटाच्या पुढे गेल्याची माहिती प्रतीक मिश्रा या प्रवाशाने दिली. डबा फलाटाच्या पुढे लागल्याने गाडीत चढायचे कसे असा गंभीर प्रश्न दिव्यांग प्रवाशांसमोर उभा राहिला होता. त्याची दखल घेत सहप्रवाशांनी दिव्यांगांना मदत देत ट्रकमध्ये उतरवून गाडीत चढण्यास मदत केली. दरम्यान, रेल्वेच्या अक्षम्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
रेल्वेला माहितीच नाही
चेन्नई मेल एक्प्रेसला दिव्यांगांसाठी असलेला डबा गुरुवारी फलाटाच्या पुढे लागला होता. याबाबत प्रवाशांनी रेल्वेच्या उपस्थित कर्मचाऱयांकडे तक्रार केली, मात्र त्याची कोणीच दखल घेतली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच या घटनेबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागात विचारणा केली असता त्यांनाही याची माहिती नसल्याची गंभीर बाब समोर आली.






























































