अतुल कोकळेच्या झुंजार खेळीनंतरही मुंबईचे आव्हान संपुष्टात

अतुल कोकळेच्या 97 धावांच्या झुंजार खेळीनंतरही यजमान मुंबईचे एलआयसी चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हरयाणाने मुंबईचा 11 धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली. आता उपांत्य फेरीत हरयाणाचा सामना बडोद्याशी होणार आहे. दुसऱ्या लढतीत दिल्ली आणि केरळ आमने-सामने असतील.

मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करताना अजय म्हात्रेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हरयाणाचा डाव 19.4 षटकांत 171 धावात संपवला. प्रत्युत्तरादाखल मुंबईची 5 बाद 25 अशी घसरगुंडी उडाली, पण अतुल कोकिळेच्या 58 चेंडूंतील 7 चौकार आणि 8 षटकारांच्या दणकेबाज 97 धावांच्या खेळीने मॅचमध्ये रंगत आणली. पण हरयाणाच्या गुरजंतने त्याची विकेट काढल्यामुळे त्याचे शतक हुकले आणि मुंबईचे स्वप्नही भंगले. मुंबईला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 160 धावांपर्यंत मजल मारता आली.