
‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली लोकांकडून कोटय़वधींचा निधी गोळा करून त्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांची आज दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेत साडेतीन तास कसून चौकशी करण्यात आली. सोमय्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला.
विक्रांत प्रकरणी सोमय्यांविरुध्द दाखल गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील जनरल चिटिंग युनिट-4 करत आहे. या प्रकरणात सोमय्यांना सोमवार ते गुरुवार असे चार दिवस सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार सोमय्या मंगळवारी सकाळी 11 वाजता तपास पथकासमोर हजर झाले. तपास अधिकाऱ्याने गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती करून सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला. आज बुधवारी पुन्हा सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहणार आहेत.






























































