मुंबईकर अजूनही बिनधास्त, मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष! कोरोना रोखण्यासाठी पालिकेची कारवाई जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य असताना अजूनही हजारो जण मास्क न घालता बिनधास्तपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका आणि पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

शुक्रवारी एकाच दिवसांत 20 हजार 818 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 44 लाख 24 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 1 एप्रिल 2020 पासून 2 एप्रिल 2021 पर्यंत 49 कोटी 15 लाख 46 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णवाढ झाली. त्यामुळे मास्क वापरत नसणाऱयांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली. सुरुवातीला एक हजारांचा दंड वसूल करण्यात येत होता. मात्र हा दंड कमी करून आता 200 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. तरीदेखील अनेकजण अजूनही मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने 24 वॉर्डमध्ये क्लीन अप मार्शल, पोलीस आणि तिन्ही रेल्वे लाइनवर कारवाईचा वेग वाढवला आहे.

…तर 500 रुपये दंडाची अंमलबजावणी

मास्कशिवाय फिरणाऱयांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 500 रुपये दंड आकारण्याची परवानगीही दिली आहे. मात्र पालिकेने अद्याप याची अंमलबजावणी केलेली नाही. मात्र हीच स्थिती कायम राहिल्यास मास्क न वापरणाऱयांकडून 500 रुपये दंड आकारण्यास सुरुवात करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ही कारवाई तीव्र करण्यासाठी क्लीनअप मार्शलची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी झाली कारवाई

पालिकेने केलेल्या कारवाईत 43 कोटी 82 लाख 51 हजार 800 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी 4 कोटी 88 लाख 70 हजार 400 रुपये दंड वसुली केली आहे.
उपनगरीय रेल्वेमध्ये विनामास्क प्रवास करणाऱयांकडून आतापर्यंत 44 लाख 24 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे.