हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहक; दोघांमध्ये तीन फुटांचे अंतर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hotels
फाईल फोटो

‘कोरोना’च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये एका वेळी फक्त 50 टक्के ग्राहकांनाच सेवा द्यावी, दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवा, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित व्यावसायिकांना दिले आहेत. हे आदेश पाळले नाही तर दंड आणि पोलीस कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

मुंबईत आज कोरोनाचे 10 रुग्ण वाढल्याने पालिकेने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करतानाच गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यांसाठी  नियमावली जाहीर केली आहे. याआधी राज्य सरकारच्या निर्देशानंतर पालिका आयुक्तांनीही गर्दी कमी करण्यासाठी परिपत्रक काढून अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कंपन्याही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे सुरूच राहणार असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार हॉटेलमध्ये एका वेळी एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्केच ग्राहकांनाच सेवा दिली जाणार आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी  ग्राहकांना होम डिलिव्हरीसाठी प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहनही पालिका आयुक्तांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सतत केंद्राच्या संपर्कात आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठीच्या सुविधा वाढविण्यात याव्यात तसेच वैद्यकीय मदतीसंदर्भात केंद्राकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. खासगी प्रयोगशाळांना चाचणीस परवानगी दिल्यास रुग्णांचे तपासणी अहवाल लवकर येण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

केईएम, नायर रुग्णालय सज्ज

‘कोरोना’ उपचार आणि क्वारंटाइनसाठी जागा कमी पडू नये यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. यामध्ये ‘कस्तुरबा’सह राजावाडी, कुर्ला-वांद्रे भाभा, सेव्हल हिल्स रुग्णालयातही ‘कोरोना’ आरोग्य सुविधा सुरू केली आहे. यामध्ये सद्यस्थितीचा सामना करण्यासाठी खाटा कमी पडू नयेत यासाठी पालिकेचे केईएम आणि नायर रुग्णालयातही ‘कोरोना’साठी आरोग्य सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित दोन्ही रुग्णालयांमध्ये ऍडमिटची गरज नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज द्यावा असे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांना दिले आहेत.