बोरिवलीत भाजप, काँग्रेस कार्यकर्ते भिडले

21

सामना प्रतिनिधी। मुंबई

बोरिवली रेल्वेस्टेशनवर सोमवारी सकाळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पुढे त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचदरम्यान, एका महीला काँग्रेस कार्यकर्त्याला धक्का लागल्याने ती किरकोळ जखमी झाली. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी बोरीवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्याकडे पाहून अश्लील डान्स केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

उर्मिला यांना पोलीस संरक्षण

या प्रकारामुळे माझ्या पुढील प्रचार यात्रा, बैठकीसाठी मुंबई पोलिसांनी तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे. माझ्या जीवाला धोका असून या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिस संरक्षण दिले.

काँग्रेसची जुनीच सवय – शेट्टी

निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. आपण करायचे आणि दुसऱयांवर आरोप लावायचा ही काँग्रेसची जुनी सवय आहे असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँगेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेला मारहाण करून शिवीगाळ केली. मोदींविरोधात घोषणाबाजी करून आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी भाजपाच्यावतीने आमदार प्रवीण दरेकर, भाजप उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, लीगल सेल प्रमुख ऍड शिवाजी चौगुले, नगरसेवक गणेश खणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी, बोरिवली यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महिलेला केलेली मारहाण चालते का – विनोद तावडे

अभिव्यक्ती स्वातंत्रयाची गळचेपी होत असल्याचा आरोप करून उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रकेश केला होता.मात्र बोरिवलीत जो प्रकार घडला त्यात कोणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते दहा दिवसांतच उर्मिला यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विसर पडला काय असा सवाल विनोद तावडे यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या एका महिलेला देखील मारहाण केली. हे उर्मिला यांना चालते काय असेही तावडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या