बंद दरवाजांची साधी लोकल दोन दिवसांत मुंबईत, लवकरच मध्य रेल्वेवर धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांना होणाऱया गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी देशातील पहिली बंद दरवाजांची नॉन-एसी लोकल मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. पुढील दोन दिवसांतच ही विशेष लोकल मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा लोकलच्या गर्दीमुळे खाली पडून मृत्यू झाला. त्या घटनेनंतर प्रवासी गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्याच अनुषंगाने प्रवाशांच्या  सुरक्षिततेसाठी नवा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासन स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकलची चाचणी कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आली होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रवाशांना स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकलची प्रतीक्षा आहे. चेन्नईतील पेरांबूरस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल तयार करण्यात आली आहे. बंद दरवाजांची ही देशातील पहिली नॉन-एसी लोकल ट्रेन असून ती मुंबईसाठी रवाना झाली आहे. दोन दिवसांतच कुर्ला कारशेडमध्ये दाखल होऊन ही ट्रेन प्रवासी सेवेत धावणार आहे. 268201- 268212 क्रमांक असलेली ही 12 डब्यांची आधुनिक ट्रेन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुसज्ज आहे. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या स्थानकांवर चालवली जाण्याची शक्यता आहे. यापाठोपाठ नजीकच्या काळात दुसरीही लोकल प्रवासी सेवेत आणण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

चेन्नईतून निघालेल्या विशेष लोकलचा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील एका स्टेशनवर औपचारिक ताबा स्वीकारला जाणार आहे. तेथून पुढे कुर्ला कारशेडमध्ये आल्यानंतर पुढील काही दिवस गाडीची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.