
विकास सगळ्यांना हवा आहे. पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे. आज आपण परवडणाऱया घरांविषयी बोलतो, त्याचप्रमाणे आपल्याला आता परवडणाऱया आणि पर्यावरणपूरक अशा वाहतुकीविषयीही बोलावे लागेल. विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.
महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाइन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाने सगळ्या जगाचे पॉझचे बटण दाबले असले तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे ते शिकविले आहे. आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविले आहे.
मुंबईने देशाला दिशा दाखवली
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी समुद्रकिनारे, उद्याने, गुंफा, जंगलदेखील असून मुंबईतील विकासाकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईने देशाला कायम एक दिशा दाखविली आहे. याचा प्रत्यय कोरोनाकाळात धारावी पॅटर्नवरून आलाच आहे. पर्यावरण रक्षणासाठी मुंबईतील 800 एकर आरेचा भूभाग वनासाठी संरक्षित केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसना, मेट्रोलाही प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
या परिषदेत शहर, राज्य आणि नवी जागतिक व्यवस्था यावर चर्चा झाली. प्रारंभी ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अक्षय माथूर यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष सुजय जोशी यांनी स्वागत केले. यावेळी हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिनाय कौनलकिस, थेरेसा शॉपर, मिनिस्टर ऑफ स्टेट, मिनिस्टरी ऑफ बेडेन-वुटमबर्ग, ख्राईस्टचर्चच्या मेयर लियान डॅलझिअल, न्यू साऊथ वेल्सच्या गव्हर्नर मार्गारेट बेझली यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.



























































