
सामना प्रतिनिधी। मुंबई
कोकण बोर्डाचे विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल ठरत आहे. मात्र स्पर्धा परीक्षांकडे कोकणातील विद्यार्थी गंभीरपणे बघत नाहीत. त्यांच्यामध्ये ही आवड निर्माण करण्यासाठी , आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोकण बोर्डाच्या माध्यमातून कोकणातील काही संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू करावे अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी केले. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.
शाळांमधील क्रीडा शिक्षकांना स्वतंत्र दर्जा द्यावा, क्रीडा विषयाला ग्रेडऐवजी गुण द्यावेत, असेही पोतनीस म्हणाले. बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गरीब कुटुंबातील व्यक्तीला रोजगार मिळवून देण्यासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उभारावी, पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत नोकरी न मिळालेल्या दरमहिन्याला 1500 रूपयांचा सुशिक्षित बेरोजगार भत्ता सुरू करावा, अशी मागणी पोतनीस यांनी केली. मेडीकलच्या विद्याथ्यार्चे विद्यावेतन , मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कौशल्यविकासाच्यादृष्टीने बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पावरील चर्चेत मनिषा कायंदे, किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.





























































