
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस एकटय़ाने लढणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱयांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यू. बी. वेंकटेश यांच्याह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरानंतर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर आघाडीबाबत निर्णय घेण्याचे आम्हाला पक्षाने सांगितले आहे. त्यामुळे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे आमची भूमिका मांडली आहे. आमच्या समविचारी पक्षाशी आम्ही आघाडीबाबत चर्चा करू, असे त्या म्हणाल्या.
मुंबईत एकटय़ाने लढले पाहिजे अशी काँग्रेस पदाधिकाऱयांची मागणी आहे. निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे त्यांचे म्हणणे काँग्रेसच्या प्रभारींसमोर ठेवण्याचे काम मी केले आहे.
दरम्यान त्यापूर्वी रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला आहे. त्याबद्दल आम्ही लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत असे ते म्हणाले.


























































