जामखेडमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याचा मुंबई कंट्रोल रूमला फोन, पोलीस यंत्रणेची धावाधाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवले असल्याची माहिती फोनवरून मुंबईतील पोलिसांच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. त्यानंतर तपास यंत्रणांसह बॉम्बशोधक व नाशक पथकांनी नान्नज गाठले. मात्र, तपासानंतर ही अफवाच असल्याचे समोर आल्याने सर्वांचा जीव भांडय़ात पडला. ही अफवा दिनेश सुतार या व्यक्तीने पसरवली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवले असल्याची खबर मुंबई येथील पोलीस कंट्रोलला मिळाली. त्यांच्याकडून ही माहिती जामखेड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर जामखेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू थोरात, सहायक उपनिरीक्षक शिवाजी भोस, कॉन्स्टेबल आबा आवारे, सतीश दळवी, नवनाथ शेकडे हे फौजफाटय़ासह बालाजी मेडिकलजवळ सकाळी दहा वाजता दाखल झाले. पोलिसांनी दिवसभर बालाजी मेडिकलसह परिसराची तपासणी करून तेथे लक्ष केंद्रित केले. सायंकाळी 5च्या सुमारास नगर येथील बॉम्बशोधक व नाशक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मुरकुळे, हवालदार एस. सी. येटेकर, पोलीस नाईक सतीश तवार, उमेश मोरे, दिनेश पळलकर, अंकुश कुलांगे, कॉन्स्टेबल गौरव भिंगारदिवे, देवीदास शेंडे, रोहित कांबळे, अरुण गायकवाड, गडदे नान्नजमध्ये दाखल झाले. मेडिकलसह संपूर्ण परिसराची या पथकाने तपासणी केली. डॉग स्क्वॉडमधील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, बॉम्बसदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी सहायक फौजदार शिवाजी दशरथ भोस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश सुतार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती तपास करीत आहेत.