
मुंबईत गेल्या महिनाभरापासून रुग्णवाढ सुरूच असून फक्त जून महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल चार पटींनी वाढली आहे. जूनच्या सुरुवातीला मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 970 इतकी होती. 1 जुलै रोजी हा आकडा 11 हजार 844 वर पोहोचला आहे. शिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असून 324 वरून आकडा 2 हजार 496 वर पोहोचला आहे. जूनमध्ये मुंबईत 44 हजार 686 बाधित आढळले आहेत.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून तीन ‘कोरोना लाटां’चा यशस्वीपणे सामना करण्यात यश आले. मात्र एप्रिलमध्ये तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असताना मे महिन्यापासून पुन्हा एकदा रुग्णवाढ होत आहे. यामध्ये दैनंदिन रुग्णांचा 50 ते 100 पर्यंत खाली आलेला आकडा दोन हजारांपार गेल्याने पालिकेसाठी पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. मात्र 12 वर्षांखालील मुले वगळता लसीकरण पूर्ण झालेले असल्याने सध्याच्या रुग्णवाढीची तीव्रता जास्त नसल्याचे आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे. मात्र सध्याच्या रुग्णवाढीची तीव्रता कमी असली तरी मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुपटीचा कालावधी 1295 दिवसांनी घटला
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही झपाटय़ाने कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्ण दुपटीचा कालावधी 8 हजार 739 दिवस होता. तो 1 जूनला 1765 दिवसांवर तर 1 जुलैला 1295 दिवसांनी कमी होऊन 470 दिवसांवर खाली आला.
मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
आतापर्यंतचे एकूण रुग्ण -1111227
कोरोनामुक्त झालेले – 1079774
कोरानामुळे झालेले मृत्यू – 19609
सध्याचे सक्रिय रुग्ण – 11844
लक्षणे असलेले बाधित – 2820
लक्षणे नसलेले रुग्ण – 9001
मुंबई 978 बाधित
मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 12 हजार 452 चाचण्यांमध्ये 978 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 54 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 4 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर 1896 रुग्णांनी कोरोनावर मात केली.




























































