सोसायट्यांमध्ये निर्बंध कडक, दहा हजारांवर ठिकाणी नाकाबंदी!

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा झपाटय़ाने वाढू लागला असून चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये रुग्णवाढ सर्वाधिक आहे. सद्यस्थितीत दररोज दहा हजारांवर रुग्ण आढळत असून यातील 80 टक्क्यांवर रुग्ण इमारतींमध्ये आढळत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इमारतींमध्ये कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून 10 हजार 169 ठिकाणे प्रतिबंधित म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये 740 पूर्ण इमारती तर 9429 इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत.

मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना वेगाने वाढत आहे. त्यामुळे पालिकेचे आव्हान वाढले आहे. विशेष म्हणजे चाळी-झोपडट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्णनोंद होत असल्यामुळे पालिकेने पाचपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत तर दोनपेक्षा जास्त रुग्ण संबंधित मजला किंवा भाग सील करण्यात येत आहे. कोरोना रोखण्यासाठी आता सोसायटय़ांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये सील करण्यात आलेला मजला किंवा इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करून या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रतिबंधित ठिकाणी नियम पाळले नाहीत तर सोसायटीला 10 हजारांचा दंड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रतिबंधित ठिकाणांवर पोलिसांचीही नजर राहणार आहे.

एका आठवडय़ात 1318 ठिकाणे वाढली

मुंबईत सद्यस्थितीत दैनंदिन रुग्णवाढ दहा हजारांवर गेली असून एप्रिलमध्ये 1 ते 7 तारखेपर्यंत तब्बल 1318 प्रतिबंधित ठिकाणे वाढली आहेत. 1 एप्रिल रोजी मुंबईत 657 पूर्ण इमारती आणि 8111 इमारतींचे मजले-भाग सील होते. यामध्ये वाढ होऊन 7 एप्रिल रोजी पूर्ण सील इमारतींची संख्या 740 तर सील मजल्यांची संख्या 9429 वर पोहोचली आहे.

20 लाख मुंबईकर नियमांच्या कचाटय़ात

  • मुंबईत इमारतींच्या तुलनेत चाळी-झोपडपट्टय़ांची स्थिती काहीशी चांगली आहे. चाळी-झोपडपट्टीत सद्यस्थितीत केवळ 73 कंटेनमेंट झोन असून 73 हजार घरांमधील 3 लाख 18 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.
  • 740 पूर्ण इमारती सील असून या ठिकाणच्या 1 लाख 25 हजार घरांमधील 4 लाख 83 हजार रहिवासी नियमांच्या कचाटय़ात आहेत.
  • तर 9429 सील मजल्यांच्या 3 लाख 3 हजार घरांमधील 12 लाख 63 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रातील एकूण 435300 घरांमधील 2064000 हजार मुंबईकर प्रतिबंधात आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या