
मुंबईत गेल्या २४ तासांत ३२४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता ५१९४ वर पोहोचला आहे. मुंबईत एकाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्याही २०४ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून एकाच दिवसात नवीन ३४ रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांचा आकडा २७५ वर पोहोचला आहे. दादर, माहीममध्ये मात्र एकही रुग्ण आढळला नाही.
मुंबईत कोरोनोविरोधात सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे गेले सलग दोन दिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत होती. यामध्ये २४ एप्रिल रोजी ३८७ असणारी संख्या काल २८१ पर्यंत खाली येत ७६ रुग्ण घटले होते. मात्र आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ३२४ इतका नोंदवला गेला. पालिकेच्या आणि खासगी रुग्णालये-प्रयोगशाळांमध्ये केलेल्या ३२८ चाचण्यांमधून पालिकेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आज झालेल्या १३ मृत्यूंमध्ये आठ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. तर मृतांपैकी नऊ जणांना दीर्घकालीन आजार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. आजच्या अहवालात २२ आणि २३ एप्रिल रोजी झालेल्या कोरोना चाचण्यांच्या प्रलंबित रिपोर्टचा समावेश असल्याचेही पालिकेने जाहीर केले आहे.
एकाच दिवसांत १३५ जण कोरोनामुक्तमुंबईत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४३ ने वाढला असला तरी एकाच दिवसात तब्बल १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांचा आकडा ८९७ वर पोहोचला आहे.
अशी आहे आकडेवारी
– २१ एप्रिल ४१९ रुग्ण १२ मृत्यू
– २२ एप्रिल २३२ रुग्ण १० मृत्यू
– २३ एप्रिल ५२२ रुग्ण ६ मृत्यू
– २४ एप्रिल ३५७ रुग्ण ११ मृत्यू
– २५ एप्रिल २८१ रुग्ण १२ मृत्यू
– २६ एप्रिल ३२४ रुग्ण १३ मृत्यू

























































