रिसेप्शनिस्ट, टेलिफोन ऑपरेटर्स यांनाही शिल्लक बेडची माहिती असणे गरजेचे! पालिका आयुक्तांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांत काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट आणि टेलिफोन ऑपरेटर्स यांनीही रुग्णालयातील शिल्लक बेडची माहिती करून घ्यावी. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक आहेत का, असे विचारणा करणाऱ्या नातेवाईकांना योग्य ती माहिती मिळेल आणि गैरसमज होणार नाहीत, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खासगी रुग्णालयांना केली आहे.

पालिकेने कोरोना रुग्णांसाठी कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती देण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केला आहे. या वॉररूमचे नंबरही जाहीर केले आहेत. मात्र, काही वेळा कोरोना रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी थेट जवळच्या रुग्णालयात फोन करतात अशावेळी रिसेप्शनिस्ट किंवा टेलिफोन ऑपरेटर्सकडून रुग्णालयांत किती बेड शिल्लक आहेत, याची योग्य ती माहिती मिळत नाही. काही वेळा माहीत नाही, असे उत्तर मिळते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी आणि गैरसमज निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त आणि मोठ्या खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची आज एक विशेष बैठक झाली. त्यात रिसेप्शनिस्ट आणि टेलिफोन ऑपरेटर्स यांनीही शिल्लक बेडची माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे आयुक्त म्हणाले. याबरोबरच बैठकीत खासगी रुग्णालयात विभाग स्तरावरील वॉर्ड वॉर रूमचा संपर्क क्रमांकही असावा, शिल्लक बेडची माहिती कर्मचाऱ्यांना नसल्यास त्यांना ती वॉर्ड वॉररूममधून घेता येईल, अशी सूचनाही आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना केली आहे.