मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढली; रुग्ण संख्याही नियंत्रणात, मिशन धारावीला यश

889

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला असून गेल्या सहा महिन्यांत मुंबईत ३ लाख ६४ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी टप्प्याटप्याने खासगी लॅब आणि पालिका रुग्णालयांत कोरोना लॅब सुरू करून चाचण्यांची क्षमता वाढवली आहे. वाढवलेल्या कोरोना चाचण्या आणि जलद गतीने सुरू असलेल्या उपचारांमुळे रुग्णसंख्याही नियंत्रणात ठेवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक चाचण्या म्हणजे खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून पालिका प्रशासनाने चाचण्या करण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करून चाचण्या केल्या आहेत. मुंबईत ३ फेब्रुवारीला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर ११ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला. ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये १ लाख चाचण्या झाल्या तर १ जूनला २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. २४ जूनपर्यंत ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. आजपर्यंत एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. मुंबई महानगरपालिका कोरोना चाचण्या कमी प्रमाणात घेत असल्यामुळेच मुंबईतील रुग्णांची आकडेवारी कमी दिसत आहे, असा आरोप काही जणांकडून करण्यात आल्यानंतर पालिकेने सविस्तर माहिती देत आरोपांचे खंडन केले आहे. हे आरोप दिशाभूल करणारे आहेत, ते वस्तुस्थितीचा धरून नाहीत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

अँटिजेन चाचण्यांमुळे वेग वाढला 
महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करू शकणार्‍या अँटिजेन टेस्ट युद्ध पातळीवर खरेदी करून चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. सुमारे १ लाख अँटिजेन टेस्ट यामुळे होणार आहेत. ३ जुलै २०२० पासून या टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ५ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात सुमारे ५ हजार ४८३ चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच, काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे.

मार्गदर्शक नियमांमध्ये बदल  
चाचण्यांची संख्या वाढवताना त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही महानगरपालिका प्रशासनाने सुयोग्य बदल केले आहेत. प्रारंभी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वैद्यकीय प्रपत्र (प्रीस्क्रीप्शन) असल्याशिवाय चाचणी करण्यास परवानगी दिली जात नव्हती. त्यामध्ये सवलती देण्यात आल्या. ई-प्रीस्क्रीप्शन व रुग्णांनी स्वघोषणा पत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देण्यासारखे पर्याय उपलब्ध करुन सुलभता आणली. आता मुंबईतील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच ‘प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उपचार सुविधांमध्ये वाढ
एका बाजूला चाचण्या वाढवत असताना बाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये क्षमता वाढ, ठिकठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारणे, ऑक्सिजन व आयसीयू उपचार सुविधा पुरवणे ही कामेदेखील प्रशासनाने केली. सोबतच, बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचे अलगीकरण करण्याचे प्रमाण वाढवण्यात आले. बाधितांच्या कमी-अधिक संपर्कात असलेल्या अशा सुमारे १६ लाखांहून अधिक व्यक्तीचा आतापर्यंत शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्यात आला आहे. यातील सुमारे १३ लाख ४४ हजारापेक्षा अधिक व्यक्तींनी अलगीकरण (क्वारंन्टाईन) पूर्ण केले आहे.

मिशन धारावीला यश
बाधितांच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती (हाय रिस्क कॉन्टॅक्ट) जास्तीत जास्त संख्येने अलगीकरण (क्वारंन्टाईन) करण्यात येत आहे. यामुळेदेखील रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन आतापर्यंत ५ लाख ३८ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे. विविध परिसरांमध्ये ४४३ फिवर क्लिनीकच्या माध्यमातून तपासणी शिबीर घेऊन बाधितांचा शोध घेतला आहे. फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे. विशेषत: धारावीसारखा परिसर एकवेळ हॉटस्पॉट म्हणून गणला जात होता, मात्र आता धारावीत कोरोना रुग्णांची संख्या आता तीनवर आली आहे.  धारावीतील अथक प्रयत्नांचे तर थेट केंद्र सरकारनेही कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या