
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे आज मुंबईत दिवसभरात 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 411 दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, आज दिवसभरात 501 रुग्ण सापडले.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 266 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 85 हजार 307 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 411 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 654 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 26 लाख 41 हजार 996 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 4 हजार 122 वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 4,589 जण कोरोनामुत्त, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 4 हजार 589 जण कोरोनामुक्त झाले. रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला असून 3 हजार 15 रुग्ण आढळले. कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 59 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.53 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 39 लाख 57 हजार 469 चाचण्या झाल्या असून 19 लाख 97 हजार 992 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 18 हजार 325 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 230 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

























































